हुबळीतील रेल्वे स्टेशन रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकीस्वाराचा तोल जाऊन तो रस्त्यावर पडला. त्याचवेळी मागून चिगरी बस येत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला. सुदैवाने दुचाकीस्वार बचावला.

भिमण्ण हे दुचाकीवरून सीबीटीच्या दिशेने जात असताना खड्ड्यामुळे त्यांचे नियंत्रण सुटले आणि ते रस्त्यावर पडले. त्याचवेळी मागून चिगरी बस येत होती. काही क्षणांचा विलंब झाला असता तर ते बसच्या चाकाखाली सापडले असते.


या घटनेनंतर भिमण्ण यांनी त्याच खड्ड्यामुळे दुसऱ्या वाहनधारकाचा अपघात होऊ नये, यासाठी स्वतःच्या खर्चाने खड्डा बुजवला. यासाठी वाहतूक पोलिसांनीही सहकार्य केले.
शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि ठिकठिकाणी पडलेले खड्डे वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहेत. रस्त्यांच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या यंत्रणेने वेळीच दुरुस्ती करणे अपेक्षित असताना नागरिकांना स्वतः पुढाकार घ्यावा लागत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
अपघात झाल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी अपघात टाळण्यासाठी रस्त्यांची वेळेत दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.


Recent Comments