ऊसदरासह विविध मागण्यांसाठी सुरू असलेले शेतकरी आंदोलन निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे. आज साखर कारखानदारांच्या बैठकीत होणाऱ्या निर्णयाकडे शेतकरी संघटनांचे लक्ष लागले आहे.
कर्नाटक हसिरू सेना आणि कर्नाटक राज्य रयत संघासह विविध शेतकरी संघटनांनी सुरू केलेल्या जेलभरो पदयात्रेचा आज तिसरा दिवस आहे. मंगळवारी रात्री गुरलापूर येथून कब्बूरमार्गे ही पदयात्रा हुक्केरीत पोहोचली. त्यानंतर शेतकऱ्यांनी बडकुंद्री येथील होळेम्मा मंदिरात मुक्काम केला.

शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष चूनाप्पा पुजेरी यांनी सांगितले की, पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या पुढाकाराने मंगळवारी झालेल्या बैठकीत सुमारे ९० टक्के मागण्यांवर तोडगा निघण्याची चिन्हे दिसली आहेत. आज साखर कारखानदारांसोबत बैठक होऊन निर्णय जाहीर केला जाणार आहे. शुक्रवारपासून कारखाने सुरू होणार असल्याने त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत स्पष्ट निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
आजही पदयात्रा सुरू राहणार असून सवलत्ती मुक्ती मठात मुक्काम करण्यात येईल. त्यानंतर बेळगावातील सीपीएड मैदानावर आंदोलन सुरू ठेवण्यात येणार असल्याचे चूनाप्पा पुजेरी यांनी सांगितले.
हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर महास्वामी यांनी केंद्र आणि राज्य सरकारने परस्परांवर आरोप करण्याऐवजी एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या मागण्या सोडवाव्यात, असे आवाहन केले. बडकुंद्री होळेम्मा देवीच्या सान्निध्यात हे आंदोलन संपुष्टात यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी हजारो शेतकरी उपस्थित होते.


Recent Comments