ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे एका कारमधील महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, तिचे संपूर्ण कुटुंब गंभीर जखमी होऊन रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असल्याची धक्कादायक घटना हुबळी येथे घडली आहे.
हुबळीतील कारवार रस्त्यावरील केमपेकेरे आईस फॅक्टरीजवळ ही घटना घडली. ट्रक चालकाने मागे न पाहता अचानक ट्रक रिव्हर्स (मागे) घेतला. त्याच वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या कारची ट्रकला जोरदार धडक बसली. या अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या अंचटगेरी येथील रहिवासी रेणुका चंद्रप्पा रेड्डर यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील शरणू चंद्रप्पा रेड्डर, पूजा प्रवीण बिडनाळ आणि कार चालक सुहास हे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

या भीषण अपघातानंतर संतप्त स्थानिक नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आणि रस्त्यावरील वाहतूक सुरक्षेबाबत योग्य ती ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले.


Recent Comments