पूर्वी विधानपरिषदेवर मुत्सदी व अभ्यासू मंडळी निवडून येत असत; मात्र अलिकडच्या काळात विधानपरिषदेचे स्वरूपही विधानसभेसारखेच झाले आहे, अशी उद्विग्न खंत विधानपरिषद सभापती बसवराज होरट्टी यांनी व्यक्त केली.
पश्चिम पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीनिमित्त शहरातील फातिमा हायस्कूल येथील मतदान केंद्रावर मतदान केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शिक्षक मतदारसंघातील उमेदवारही पैशांच्या जोरावर निवडून येत असल्याचे चित्र अत्यंत क्लेशदायक आहे. शिक्षकांनी अशा प्रलोभनांपासून दूर राहून योग्य उमेदवाराची निवड केली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीत दर निवडणुकीत नव्याने नोंदणी करण्याची पद्धत अयोग्य आहे. एकदा पदवी प्राप्त केल्यानंतर ती व्यक्ती आयुष्यभरासाठी पदवीधरच राहते. त्यामुळे प्रत्येक वेळी नव्याने नोंदणी घेण्याऐवजी केवळ नाव समाविष्ट करण्याचीच तरतूद असावी, असे मत त्यांनी मांडले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी काही घटकांनी व्हिडिओ व पेनड्राइव्हचा वापर करून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला असावा, किंवा तो एआय निर्मित व्हिडिओ असू शकतो. अशा स्वरूपाचे कृत्य राजकारणाला काळीमा फासणारे आहे. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करून दोषी कितीही प्रभावशाली असले तरी त्यांची तुरुंगामध्ये रवानगी करावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
माजी मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळाची आठवण करून देताना ते म्हणाले की, केंगल हनुमंतराया यांनी विधानसौध उभारले, रामकृष्ण हेगडे यांनी प्रशासकीय विकेंद्रीकरणावर भर दिला, तर कुमारस्वामी यांनी ग्रामवास्तव्य उपक्रम राबवला. मात्र, सध्याचे सरकार केवळ स्टिंग ऑपरेशन करण्यात गुंतले आहे, असा टोला बसवराज होरट्टी यांनी लगावला.


Recent Comments