खानापूर तालुक्यातील कोडचवाड येथील ५ एकर सरकारी गायरान जमीन इतर कारणांसाठी वापरण्यासंदर्भात सरकारकडे अहवाल पाठवण्याचा अधिकाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी ग्रामस्थांनी आज तहसीलदार कार्यालयावर धडक देऊन तीव्र निदर्शने केली.
पशुपालन आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी एकमेव आधार असलेली ही जागा वाचवण्याची मागणी करत ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदन सादर केले.

कोडचवाड गावात शेती आणि पशुपालन हाच बहुतांश जनतेच्या उपजीविकेचा मुख्य आधार असून, संपूर्ण गावातील गुराढोरांना चरण्यासाठी केवळ ५ एकर सरकारी गायरान जमीन उपलब्ध आहे. असे असताना, ही जागा इतर सरकारी प्रकल्पांसाठी वर्ग करण्याचा अहवाल अधिकारी तयार करत असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. या निर्णयामुळे जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊन शेतकऱ्यांवर अन्याय होईल, अशी भीती व्यक्त करत कोणत्याही परिस्थितीत गायरान जमीन अन्य कारणासाठी वापरू नये, असा इशारा आंदोलकांनी दिला.
यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक प्रमोद कोछेरी, राजशेखर हिंडलगी, शेतकरी नेते रुद्रगौडा पाटील, कल्लप्पा येमोजी, नंदकुमार बाळेकुंदरी, विठ्ठल रामाजी, जिन्नप्पा हट्टीहोळी, रोहन कोळकार, परशुराम रामाजी, येल्लप्पा हिंडलगी, फक्कीरा होंनगेकर, तुकाराम भातकांडे, यल्लप्पा बाबाजी यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments