खानापूर तालुक्यातील बिडी ग्रामपंचायत क्षेत्रात स्थानिक ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्याच्या (PDO) निष्काळजीपणामुळे भरदुपारीही पथदिवे सुरू असल्याचे समोर आले आहे.
क्रांतिवीर संगोळी रायन्ना सर्कल ते दर्ग्यापर्यंतच्या मुख्य रस्त्यावर दिवसाढवळ्या सुरू असलेल्या या विजेच्या उधळपट्टीमुळे सार्वजनिक कराच्या पैशांचा अपव्यय होत असून स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

बिडी ग्रामपंचायत हद्दीतील मुख्य रस्त्यावरील विजेच्या खांबांवर दुपारीही पथदिवे सुरू राहिल्याने नागरिकांनी अधिकाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वीज पुरवठा वाहिनीमध्ये काही तांत्रिक बिघाड असल्यास तात्काळ हेस्कॉम (HESCOM) विभागाशी संपर्क साधून दुरुस्ती करून घेणे गरजेचे असताना, संबंधित अधिकाऱ्याकडून पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे.
यापूर्वीही एका खासगी संस्थेच्या शिबिराला नियमबाह्य परवानगी दिल्याप्रकरणी तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी (EO) रमेश मेत्री यांनी संबंधित ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तसेच रस्त्या कडेला कचरा टाकण्याच्या मुद्द्यावरूनही हा कारभार चर्चेत आला होता. आता हेस्कॉमचे बिल भरण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या कराचा पैसा वाया जात असताना दाखवल्या जाणाऱ्या या निष्काळजीपणाविरोधात लोकभावना संतप्त झाल्या आहेत. त्यामुळे आतातरी तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी या प्रकाराची दखल घेऊन संबंधित निष्काळजी अधिकाऱ्यावर कडक कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Recent Comments