Chikkodi

गुर्लापूरमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र; प्रतिटन ५,५०० रुपये दरासाठी शेतकरी आक्रमक!

Share

गुर्लापूर येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू झालेल्या आंदोलनाने दुसऱ्या दिवशी अधिक तीव्र रूप धारण केले आहे.

शेतकरी नेते चुन्नप्पा पुजेरी आणि शशिकांत गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली हे भव्य आंदोलन उभारण्यात आले असून, यात हजारो शेतकरी सहभागी होऊन प्रशासनाविरोधात आपला आक्रोश व्यक्त करत आहेत.

प्रतिटन उसाला किमान ५,५०० रुपये दर तातडीने जाहीर करावा, वाढत्या महागाईनुसार आधारभूत दरात वाढ करण्यात यावी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून प्रतिटन १,००० रुपये प्रोत्साहनपर अनुदान वितरित करण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन केले जात आहे.

आज पार पडलेल्या भव्य निषेध सभेत हजारो शेतकऱ्यांनी एकत्र येत उसाला योग्य व न्याय्य दर मिळेपर्यंत माघार घेणार नाही, असा एकमुखी निर्धार व्यक्त केला. योग्य दर मिळाल्याशिवाय कारखान्यांना ऊस पुरवठा केला जाणार नाही, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

दुसरीकडे, गुर्लापूर येथे शेतकऱ्यांचे आंदोलन तापलेले असतानाच बेळगाव येथे मुख्यमंत्री आणि साखर कारखाना मालकांची उच्चस्तरीय बैठक पार पडत आहे. या बैठकीत उसाचा दर आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण शेतकरी बांधवांचे लक्ष लागले आहे. या बैठकीतील निर्णयानुसार पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असे शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

Tags: