प्लॉटची कागदपत्रे देण्यासाठी दबाव आणत बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप हुबळीतील सेटलमेंट परिसरात करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रकाश दासरेड्डी आणि मिथुन जाधव यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तक्रारदार महम्मदगौस बाबुसाब चन्नापूर यांनी एलिट डेव्हलपर्स अँड बिल्डर्सकडून ६०० चौरस फुटांचा प्लॉट खरेदी केल्याचे सांगण्यात आले. या प्लॉटला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे शक्य नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून नोटीसद्वारे कळविण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर प्रकाश दासरेड्डी आणि मिथुन जाधव यांनी एलिट डेव्हलपर्स अँड बिल्डर्सविरुद्ध तक्रार देण्यासाठी दबाव आणत प्लॉटची मूळ कागदपत्रे मागितल्याचा आरोप आहे. मात्र, महम्मदगौस यांनी कागदपत्रे देण्यास नकार दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
२७ जुलै २०२६ रोजी सकाळी साडेदहा ते पावणेअकराच्या दरम्यान महम्मदगौस हे आपल्या आईला रुग्णालयात घेऊन जात असताना हुबळीतील सेटलमेंट परिसरातील कुवेंपू सर्कलजवळ कारमधून आलेल्या आरोपींनी त्यांचे वाहन अडविल्याचा आरोप आहे. यावेळी प्रकाश दासरेड्डी यांनी बंदूक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. तक्रार दाखल करून तीन दिवस उलटूनही पोलिसांनी कारवाई केली नसल्याचा आरोप महम्मदगौस यांनी केला आहे.


Recent Comments