Chikkodi

कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन प्रत्येक ब्लॉकमध्ये काँग्रेस अध्यक्षांची नियुक्ती : विनय नावलगट्टी

Share

संघटन सृजन अभियानांतर्गत चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील प्रत्येक ब्लॉकमध्ये कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन ब्लॉक काँग्रेस अध्यक्षांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती केपीसीसी निरीक्षक विनय नावलगट्टी यांनी दिली. चिक्कोडी जिल्हा काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

संघटन सृजन अभियानाच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन राज्यातील ३० जिल्हा काँग्रेस अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. ब्लॉक अध्यक्षपदासाठी इच्छुकांना अर्ज वितरित करण्यात आले असून, केपीसीसीचे चार निरीक्षक प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला भेट देऊन कार्यकर्त्यांकडून अभिप्राय घेतील. त्यानंतर हा अहवाल एआयसीसी आणि केपीसीसीकडे सादर केला जाईल, असे नावलागट्टी यांनी सांगितले.

एआयसीसी अध्यक्षांच्या सूचनेनुसार राज्यात प्रत्येक गाव आणि बूथ स्तरावर पक्ष संघटना मजबूत करण्यात येणार आहे. आगामी काळात निष्ठावंत कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री महामंडळांच्या अध्यक्षपदाची संधी देतील, असेही त्यांनी सांगितले.

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांचा पराभव होण्यामागे अनेक कारणे आहेत. या पराभवाची कारणे शोधण्यासाठी हायकमांडकडून सखोल चौकशी समिती स्थापन करण्यात येईल, असे नावलागट्टी यांनी स्पष्ट केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत काँग्रेस उमेदवारांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

पत्रकार परिषदेला माजी मंत्री वीरकुमार पाटील, केपीसीसी निरीक्षक सुनील हणमन्नवर आणि अल्ताफ हळूर, चिक्कोडी जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष लक्ष्मराव चिंगळे, केपीसीसीचे सरचिटणीस महावीर मोहिते, सिद्धकी अंकलगी, एच. एस. नसालापूरे, राजू कोटगी, शंकरगौडा पाटील, सिद्धार्थ शिंगे आणि सतीश कुलकर्णी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: