Kagawad

कागवाडमध्ये नांगलक्ष्मी चौधरी यांच्या उपस्थितीत दहीहंडी

Share

कर्नाटक राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉ. नागलक्ष्मी चौधरी यांनी कागवाड येथील अंबाबाई मंदिरात पूजा करून डोक्यावर दह्याची हंडी घेत श्रीकृष्णाच्या भक्तीत तल्लीन होऊन दहीहंडी उत्सवात सहभाग घेतला.

कागवाड नगर पंचायतीच्या सभागृह आवारात हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकत्र येत दहीहंडी उत्सव साजरा केला. दत्त साखर कारखान्याचे संचालक ज्योतिकुमार पाटील यांच्या नेतृत्वात हजारो तरुण-तरुणी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

दहीहंडी स्पर्धेत शिरोळ तालुक्यातील ‘जय महाराष्ट्र’ तरुण संघाने प्रथम क्रमांक पटकावून ज्योतिकुमार पाटील यांच्याकडून दिले जाणारे १,११,७७७ रुपयांचे बक्षीस पटकावले.

यावेळी डॉ. नागलक्ष्मी चौधरी यांनी सर्वांना श्रीकृष्ण जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ‘अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम्’ हे भजन गाऊन वातावरण भक्तीमय करून सोडले. कागवाड शहरात पहिल्यांदाच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी अशा सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होऊन सर्वांसोबत सण साजरा केल्याबद्दल नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

या दहीहंडी स्पर्धेत शिरोळचा जय महाराष्ट्र, सांगली-कुपवाडचा एस. पी. बॉईज आणि अगारा येथील जय हनुमान तरुण संघ असे तीन संघ सहभागी झाले होते. शिरोळ नगर परिषदेचे सदस्य निलेश गावडे यांच्या जय महाराष्ट्र संघाने दहीहंडी फोडण्यात यश मिळवले.

कागवाडचे युवा नेते बाबासाहेब कल्लेाळे आणि त्यांच्या मित्रांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास ॲड. काका पाटील, किरण घुमटे, राजू लांडगे, प्रवीण पाटील, भरत खूत, अरुण जोशी, चिदानंद आवटी, विनायक चौगुले, उदय खुडे, पवन पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सुकुमार बन्नुरे
इन न्यूज, कागवाड

Tags: