देशात विविध कारणांवरून मतभेद पाहायला मिळत असले, तरी कागवाड तालुक्यातील ऐनापूर गावात हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकत्र येत गुड्डदमड्डी येथील ‘ओम श्री दुर्गापरमेश्वरी देवी’चा नवरात्रोत्सव साजरा करत सामाजिक सलोख्याचा नवा आदर्श निर्माण केला आहे.

उत्सवादरम्यान श्री दुर्गापरमेश्वरी देवीला पंचामृत अभिषेक, महाआरती व महापूजा करण्यात आली. या प्रसंगी हजारो महिला भाविक व बालिकांना ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला. तत्पूर्वी, तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातून धार्मिक ज्योत आणून गावातून मिरवणूक काढण्यात आली व घटस्थापना करण्यात आली. गेल्या ९ दिवसांत दररोज महापूजा, आरती, महाप्रसाद आणि ओटी भरण्याचे धार्मिक विधी पार पडले.


येत्या सोमवारी (२६ ऑक्टोबर) पौर्णिमेच्या रात्री चंद्रदर्शन घेतल्यानंतर देवीचे दर्शन घेण्याचा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या धार्मिक कार्यक्रमास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
या प्रसंगी मंदिर समितीचे निमंत्रक काशीम मुल्ला, रफिक नदाफ आणि सुरेश कागली यांनी देवीची कृपा व सर्वधर्मा समभावाची भावना व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंदिर समितीचे अध्यक्ष जयपाल कोकटनूर, अण्णाप्पा खटावे, सदाशिव मडीवाळ, सुरेश कागली, सुमित डोंगरे, रफिक नदाफ, राजू जकाते, पुजारी हनुमंत अडिशेरी, संतोष बोगार यांच्यासह अनेक महिला भाविकांनी विशेष परिश्रम घेतले.


Recent Comments