कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमाभागातील प्रसिद्ध धार्मिक क्षेत्र उगार बुद्रुक येथील श्री पद्मावती देवस्थानात नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून, २० ऑक्टोबर रोजी कृष्णा नदीत विशेष नदी पूजन संपन्न होणार आहे.

यानिमित्ताने श्री पद्मावती देवस्थानात दररोज देवीला मयूरपिच्छ (मोरपीस), विविध फुले, लिंबू, फळे आणि मोत्यांच्या हारांनी आकर्षक पूजा बांधली जात आहे. रविवार व सोमवारी अनुक्रमे मोरपीस आणि बांगड्यांची विशेष सजावट करण्यात आली. देवस्थानचे धर्माधिकारी शीतल गौड पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार २० ऑक्टोबर रोजी कृष्णा नदीच्या पात्रात तीन तास चालणारे नदी पूजन आणि पंचामृत अभिषेक होईल.

या महापूजेसाठी शेकडो लिटर दूध, फळे व पूजेचे विविध द्रव्य वापरले जाणार असून, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील हजारो भाविक उपस्थित राहणार आहेत. उगार येथील ग्रामस्थ सर्व भेद विसरून या उत्सवाच्या तयारीत एकत्र आले आहेत.
देवस्थानात दररोज संध्याकाळी पंचामृत अभिषेक, अखंड दीप प्रज्वलन आणि आदर्श महिला मंडळातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडत आहेत. तसेच २१ ऑक्टोबर रोजी सीमोल्लंघनानिमित्त भव्य पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.



Recent Comments