बेळगाव शहरात बेकायदेशीरपणे हेरॉईन या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या टोळीचा सीसीबी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. राष्ट्रीय महामार्गाजवळ छापा टाकून पोलिसांनी दोघांना अटक केली असून, सुमारे ३ लाख रुपये किमतीचे हेरॉईन आणि मोबाईल जप्त केले आहेत.

१७ ऑक्टोबर २०२६ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सीसीबीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक व त्यांच्या पथकाने राष्ट्रीय महामार्गाजवळील जय किसान भाजी मार्केटच्या गेट क्र. १ जवळ छापा टाकला. या वेळी सार्वजनिक ठिकाणी हेरॉईन विक्रीचा प्रयत्न करणारे महांतेश रामण्णा आंबीगेर (वय ३७) आणि आकाश सुरेश नंदी (वय २८, दोघे रा. बेळगाव) या दोघांना ताब्यात घेण्यात आले.
अटक केलेल्या आरोपींकडून २,९०,००० रुपये किमतीचे १४.४९ ग्रॅम हेरॉईन (१२४ छोट्या पुड्या) आणि १०,००० रुपये किमतीचे २ मोबाईल असा एकूण ३,००,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील ‘अम्मा’ नावाच्या व्यक्तीकडून हे अमली पदार्थ आणल्याचे आरोपींनी सांगितले असून, याप्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पोलीस आयुक्त आणि पोलीस उपआयुक्तांनी कौतुक केले आहे.



Recent Comments