बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील विविध गावांच्या जोडणीला अधिक बळ देण्यासाठी सुमारे ७ कोटी रुपये खर्चाच्या रस्ते आणि पूल विकासकामांचे भूमिपूजन करून आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी कामांचा शुभारंभ केला.

या विकासकामांमध्ये बिजगर्णी-बडस-बाकनूर गावांना जोडणारा पूल, बाकनूर-गोळ्याळी संपर्क रस्ता तसेच बिजगर्णी-जानेवाडी आणि जानेवाडी-कर्ले संपर्क रस्ता कामांचा समावेश आहे.


बिजगर्णी-बडस-बाकनूर गावांना जोडणाऱ्या मुख्य पुलाच्या बांधकामासाठी सुमारे २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते याचे भूमिपूजन झाले. ग्रामस्थांना दिलेल्या वचनानुसार हा पूल बांधण्यात येत असून, मुदतीत आणि दर्जेदार काम पूर्ण करण्याची तंबी त्यांनी कंत्राटदारांना दिली. या वेळी विविध गावांचे ग्रामस्थ आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

याशिवाय बाकनूर आणि गोळ्याळी गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्ता निर्मितीसाठी १ कोटी रुपयांच्या निधीतून भूमिपूजन करण्यात आले. लवकरात लवकर हे काम पूर्ण करून रस्ता नागरिकांच्या वाहतुकीसाठी खुला करण्याचे निर्देश त्यांनी दिले. याप्रसंगी युवराज कदम, बाळू देसूरकर, मनोहर बेळगावकर, एस. एल. चौगुले, नारायण गोडसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

बिजगर्णी-जानेवाडी आणि जानेवाडी-कर्ले संपर्क रस्ते निर्मितीसाठी ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, संबंधित ग्रामस्थांच्या उपस्थितीत या कामांचेही भूमिपूजन संपन्न झाले. या रस्ते कामांमुळे ग्रामीण भागातील वाहतूक अधिक सुलभ होणार आहे.

या प्रसंगी बोलताना आ. लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, “बेळगाव ग्रामीण जनतेच्या आशिर्वादाने आज माझी राज्यभर ओळख निर्माण झाली असून, विकासकामांच्या माध्यमातून मी जनतेचे ऋण फेडत आहे. जात, धर्म न पाहता सर्वांसाठी काम करत आहे. निवडणुकीच्या काळात केवळ भाषणांसाठी येणाऱ्यांना न मानता, ३६५ दिवस जनतेच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या माझ्या पाठीशी आपण सर्वांनी खंबीरपणे उभे राहावे,” असे आवाहन त्यांनी केले.



Recent Comments