कागवाड तालुक्यातील मंगसुळी येथे तहसीलदार रवींद्र हादिमनी आणि तालुका पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी वीरण्णा वाली यांच्या नेतृत्वात तालुकास्तरीय ‘प्रजा सेवा आंदोलन’ उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

मंगसुळी येथील तुकाराम मंदिर सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन व वृक्षारोपणाने झाले. या वेळी शासकीय योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचवणे आणि स्थानिक समस्यांचे जागीच निवारण करणे हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

भूमापन विभागाचे व्यवस्थापक एस. एस. शेख यांनी सांगितले की, बेळगाव जिल्ह्यात कागवाड तालुक्याची आणि त्यात मंगसुळी गावाची पायलट प्रोजेक्ट म्हणून निवड करण्यात आली आहे. स्वामित्व योजनेअंतर्गत ड्रोनद्वारे सर्व्हे करून ग्रामस्थांना घरांचे मालमत्ता पत्रक (आस्ती उतारा) देण्यात येत आहे.
या कार्यक्रमास ग्रेड-२ तहसीलदार रश्मी जकाती, एम. एन. काबळे, सीडीपीओ संजूकुमार सदलगे, पोलीस उपनिरीक्षक राघवेंद्र खूत, कृषी अधिकारी कांतीनाथ बिरादार, गटशिक्षण अधिकारी चन्निग रामय्या यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन व व्यवस्थापन ग्रामपंचायत पीडीओ संजय सूर्यवंशी यांनी केले.


Recent Comments