माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अमृतमहोत्सवी जन्मदिनाच्या कार्यक्रमानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सिद्धरामोत्सवावरून विरोधकांनी खिल्ली उडविली असून सिध्दरामय्यांच्या समर्थकांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमासंदर्भात विरोधकांनी टीका करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे केपीसीसी कार्याध्यक्ष, आमदार सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.

विजापूर शहरात जिल्हास्तरीय नवसंकल्प चिंतन शिबिरात सहभागी झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. सिद्धरामय्या यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या समर्थकांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सदर कार्यक्रम वैयक्तिक रित्या आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करण्याचे ठरविले असून या कार्यक्रमावर भाजपने टीका करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे ते म्हणाले. हा कार्यक्रम सिद्धरामोत्सव नसून उरूस असल्याची टीका विरोधकांनी केली असून यावर प्रतिक्रिया देताना जारकीहोळी म्हणाले, या कार्यक्रमासंदर्भात रायरेड्डी यांनी स्पष्टीकरण दिले असून सदर कार्यक्रमासंदर्भात कोणतेही भिन्न अभिप्राय पक्षात नसून अध्यक्षांसह संपूर्ण पक्ष या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे जारकीहोळी म्हणाले.
विजापूर शहरात आयोजित करण्यात आलेल्या नवसंकल्प चिंतन शिबिरासंदर्भात प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, काँग्रेस पक्षाने नवसंकल्प चिंतन शिबिराचे राष्ट्र आणि राज्यस्तरावर आयोजन केले आहे. या शिबिरात स्थानिक कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेण्यात येणार आहेत. जिल्हास्तरीय समस्या राज्यस्तरीय नेते जाणून घेणार आहेत. आणि यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे जारकीहोळी म्हणाले. २०२३ च्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून या शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याचेही जारकीहोळी यांनी सांगितले.
निवडणूकपूर्व सर्वेक्षणासंदर्भात बोलताना जारकीहोळी म्हणाले, सर्वेक्षण सुरु आहे. या सर्वेक्षणात सर्व गोष्टी पुढे येत आहेत. प्रत्येक महिन्यात सर्वेक्षण करण्यात येत असून संपूर्ण सर्वेक्षणानंतर उमेदवार निवड करण्यात येईल. पुन्हा आपण सत्तेवर येऊ असा विश्वास देखील सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केला. शिवाय भाजपवर देखील निशाणा साधत भाजप सर्व स्तरावर अपयशी ठरले आहे. जनतेला केवळ पर्याय म्हणून भाजप पाहात असल्याचा टोला त्यांनी लगावला. काँग्रेसमुक्त भारत या भाजपच्या ध्येयासंदर्भात बोलताना ते म्हणाले, भाजपच्या हातात सध्या सत्ता आहे. चक्र फिरतील त्याचप्रमाणे वेळ बदलेल आणि आपली वेळ नक्की येईल असे सतीश जारकीहोळी म्हणाले. गोव्यातील काँग्रेस नेते भाजपमध्ये समाविष्ट होत असल्यासंदर्भात प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, काही जणांनी तसा प्रयत्न केला आहे परंतु अद्याप भाजप प्रवेश केला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ()


Recent Comments