समाजाचे आरोग्य अबाधित राखण्यात डॉक्टरांचे योगदान मोलाचे आहे. याच पार्श्वभूमीवर बेळगाव येथील भाग्यनगर सेवा केंद्रात ब्रह्माकुमारीज मेडिकल विंगच्या वतीने राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करण्यात आला.


डॉ. बी. सी. रॉय यांच्या स्मरणार्थ साजरा केला जाणारा हा दिवस डॉक्टरांच्या त्यागाचा सन्मान करणारा आहे, असे डॉ. संगीता बेळगावीमठ यांनी सांगितले. याप्रसंगी राजयोगिनी बीके अंबिका अक्का यांनी डॉक्टरांनी रुग्णांना औषधोपचारासोबत व्यसनमुक्त करण्यासाठी प्रवृत्त करावे आणि ईश्वरीय स्मरणातून सेवा करावी, असे आवाहन केले.


कार्यक्रमाला उपस्थित असलेले डॉ. संजीव उमुदी आणि डॉ. विजयलक्ष्मी उमदी यांनी प्रत्येक रुग्णालयात ध्यान कक्ष असण्याची गरज व्यक्त केली. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मुक्ता हळकुंटे यांनी महिला आरोग्य जनजागृतीवर तर बालरोग तज्ज्ञ डॉ. सौम्या विणेंकर यांनी बालपणापासून ध्यान शिकवण्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. डॉ. हेगडे यांनी निसर्गाशी सुसंगत जीवनशैली आणि योगासने याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीके शितल यांनी केले, तर महादेवी संबगी यांनी आभार मानले.


Recent Comments