सौंदत्ती येथील श्री रेणुकादेवी यल्लम्मा देवस्थान प्राधिकरणाच्या संचालकपदी कागवाडचे ज्योतिकुमार पाटील यांची राज्य सरकारने नियुक्ती केल्याबद्दल कागवाडमधील विविध संस्था आणि संघटनांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

शुक्रवारी सायंकाळी कागवाड येथील श्री मल्लिकार्जुन संस्थेच्या सभागृहात आयोजित सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून शिवानंद महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य बी. जे. पाटील बोलत होते. ज्योतिकुमार पाटील यांची नियुक्ती ही संपूर्ण कागवाड मतदारसंघासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

कागवाडचे दिवंगत सिद्धगौडा पाटील हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यांनी पक्षासह विविध संस्थांमध्ये कार्य केले. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र ज्योतिकुमार पाटील यांनी विद्यावर्धक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, पीकेपीएसचे अध्यक्ष तसेच दत्त साखर कारखान्याचे संचालक म्हणून काम पाहिले आहे. पक्षनिष्ठा आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, ज्येष्ठ मंत्री आणि कागवाडचे आमदार राजू कागे यांच्या पुढाकारातून त्यांना ही संधी मिळाल्याचे बी. जे. पाटील यांनी सांगितले.

१९५५ पासून आजपर्यंत कागवाड शहरातून एकदाही आमदार निवडून आलेला नाही. भविष्यात या शहराला आमदारपदाचा मान मिळवून देण्याचे श्रेय ज्योतिकुमार पाटील यांना मिळावे, अशी अपेक्षा विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना ज्योतिकुमार पाटील म्हणाले की, राज्य सरकारने दिलेल्या संधीचा योग्य उपयोग करून घेऊन प्रामाणिकपणे काम करेन. आपल्या अडचणी आणि सूचना मला कळवाव्यात. कागवाडमधील सर्व संस्था आणि संघटनांनी एकत्र येऊन केलेला सत्कार ही माझ्यासाठी भाग्याची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शिवानंद महाविद्यालय व्यवस्थापन मंडळाचे सचिव बी. ए. पाटील, मल्लिकार्जुन संस्थेचे अध्यक्ष कलगौडा पाटील, अक्कमहादेवी संस्थेच्या अध्यक्ष राणी पाटील, सचिव साधना लिंगनूर, वीरशैव संस्थेचे पदाधिकारी, शिवानंद अवटी, कृष्णा पाटील, अॅड. काका पाटील, बाळगौडा पाटील, बाबू चौगुले, काशिम मुल्ला, शेखर पाटील, जे. के. पाटील, चिदानंद अवटी आदी उपस्थित होते.


Recent Comments