चालू २०२६-२७ च्या गळीत हंगामात उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर जाहीर केल्याबद्दल शिरगुप्पी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा मग्गेनवर आणि जनरल मॅनेजर अरुण परांडे यांचा उगार बुद्रुक येथे शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
बुधवारी सायंकाळी उगार बुद्रुक पीकेपीएसचे अध्यक्ष शीतल पाटील यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे संचालक आणि शेतकऱ्यांनी हा सत्कार केला.

यावेळी शीतल पाटील म्हणाले की, चालू गळीत हंगामात शेतकऱ्यांना अधिक दर मिळावा यासाठी हिरवी सेना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी आणि मानद अध्यक्ष शशिकांत गुरूजी यांनी लाखो शेतकऱ्यांना एकत्र आणून आंदोलन केले. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने योग्य निर्णय घेतला नाही. त्यानंतर उसाला प्रतिटन ३,६०० रुपये दर जाहीर करण्यात आला होता.
कष्टाने ऊस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा दर योग्य नसल्याचे लक्षात घेऊन शिरगुप्पी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा मग्गेनवर यांनी प्रतिटन चार हजार रुपये दर जाहीर केला. त्यांच्या या निर्णयामुळे इतर कारखान्यांनाही दर वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा लागला. या निर्णयाचे श्रेय मग्गेनवर यांनाच जाते, असे सांगत त्यांनी त्यांचे कौतुक केले.
सत्काराला उत्तर देताना कल्लाप्पाण्णा मग्गेनवर म्हणाले की, गेल्या १५ वर्षांपासून कारखाना चालवत असून दरवर्षी इतर कारखान्यांच्या तुलनेत शेतकऱ्यांना अधिक दर देण्याचा प्रयत्न केला आहे. यंदा पावसाच्या कमतरतेमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन कारखान्याच्या संचालक मंडळाशी चर्चा करून प्रतिटन चार हजार रुपये दर देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात साखरेचे दर वाढल्यास उसाच्या दरातही आणखी वाढ केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच सत्काराबद्दल शेतकऱ्यांचे आभार मानले.
कारखान्याचे जनरल मॅनेजर अरुण परांडे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. पीकेपीएसचे उपाध्यक्ष पद्मकुमार आळप्पनवर, पद्मजित पाटील, अमीन शेख यांच्यासह इतर शेतकरी नेत्यांनी आपले विचार मांडले.
कार्यक्रमाला पीकेपीएसचे सदस्य सुरेश कुसनाळे, अण्णासाहेब वांगीरे, कल्लाप्पा तेरदाळे, अजित होसुरे, अभिषेक चौगुले, कोमल चौगुले, जयपाल एरंडोळे, मनोज कुसनहळ्ळी यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.


Recent Comments