Kagawad

शिरगुप्पी शुगर वर्क्सकडून उसाला प्रतिटन ४ हजार रुपये दर जाहीर

Share

कागवाड तालुक्यातील शिरगुप्पी शुगर वर्क्स साखर कारखान्याने २०२६-२७ या चालू गळीत हंगामासाठी उसाला प्रतिटन एकूण ४ हजार रुपये दर देण्याचा निर्णय घेतला आहे.

कारखान्याचे अध्यक्ष आणि माजी आमदार के. पी. मगेण्णवर यांनी ही घोषणा केली. शनिवारी कागवाड येथील शिरगुप्पी साखर कारखान्याच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अरुण परांडे आणि महाव्यवस्थापक महावीर बिरुणाळे उपस्थित होते.

के. पी. मगेण्णवर यांनी सांगितले की, २०२६-२७ चा ऊस गाळप हंगाम सुरू झाला आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात झालेला अल्प पाऊस, चालू वर्षातील उसाच्या पिकाची स्थिती आणि अपेक्षित ऊस उत्पादन यांसह विविध बाबींचा विचार करून संचालक मंडळाने उसाचा दर निश्चित केला आहे.

त्यानुसार ऊस उत्पादकांना पहिल्या टप्प्यात प्रतिमेट्रिक टन ३,७०० रुपये दिले जातील. गळीत हंगाम संपल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात प्रतिटन १०० रुपये दिले जातील. तसेच साखरेच्या विक्रीदरात प्रतिक्विंटल ५० रुपयांची वाढ झाल्यास पुढील गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी तिसऱ्या टप्प्यात प्रतिटन २०० रुपये दिले जातील. अशा प्रकारे उसाला एकूण प्रतिमेट्रिक टन ४ हजार रुपये दर देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चालू हंगामात सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अधिकाधिक ऊस शिरगुप्पी साखर कारखान्याला पुरवून सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अरुण परांडे म्हणाले की, राज्याच्या सीमाभागात गेल्या १५ वर्षांपासून उत्कृष्ट साखर कारखाना म्हणून शिरगुप्पी शुगर वर्क्सची ओळख आहे. कारखान्यात सहवीज निर्मिती प्रकल्पाद्वारे वीज निर्मिती तसेच इथेनॉल उत्पादनही केले जाते.

चालू गळीत हंगामासाठी उसाचा दर वाढविण्याबाबत कारखान्याचे अध्यक्ष के. पी. मगेण्णवर, व्यवस्थापकीय संचालक डॉ. रमेश गौडणवर आणि संचालक मंडळाने सविस्तर चर्चा केली. त्यानंतर प्रतिटन ४ हजार रुपये दर देण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकरी बांधवांनी या निर्णयाचा लाभ घेऊन पूर्वीप्रमाणेच अधिकाधिक ऊस कारखान्याला पुरवावा आणि सहकार्य करावे, असे आवाहन परांडे यांनी केले.

Tags: