ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या हरित सेनेच्या अध्यक्ष आणि मानद अध्यक्षांना बेळगाव पोलिसांनी अटक केल्याच्या निषेधार्थ कागवाड तालुक्यात शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले. अटक केलेल्या नेत्यांची तातडीने सुटका करावी, या मागणीसाठी गुरुवारी शेतकऱ्यांनी विविध ठिकाणी रास्ता रोको करून वाहतूक रोखली.

कागवाड तालुक्यातील राणी चन्नम्मा चौकात गुरुवारी दुपारी शेतकऱ्यांनी अचानक रास्ता रोको सुरू केला. त्यामुळे सांगली-बेळगाव, सांगली-जमखंडी आणि सांगली-विजापूर या मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. शेकडो बसगाड्यांची वाहतूक थांबल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

ऊगार, ऐनापूर, शेडबाळ आणि मंगसुळी या गावांतील प्रमुख रस्त्यांवरही शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. कडक उन्हाची पर्वा न करता शेतकरी रस्त्यावर ठाण मांडून बसले होते. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी शेतकरी आंदोलक अजित चौगुले यांनी सरकारच्या कारवाईचा निषेध केला. शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणाऱ्या नेत्यांना अटक करून सरकारने मोठी चूक केली आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवून त्यांना आवश्यक मदत देण्याऐवजी न्याय्य मागण्यांसाठी लढणाऱ्या नेत्यांनाच अटक करणे निषेधार्ह आहे. अटक केलेल्या सर्व शेतकरी नेत्यांची तातडीने सुटका करावी आणि शेतकऱ्यांना सरकारकडून मिळणाऱ्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, ऊगार-कुडची दरम्यान कृष्णा नदीवर बांधलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूंना शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक आंदोलन सुरू झाल्याने शाळकरी विद्यार्थी आणि प्रवाशांना रस्त्यातच अडकून पडावे लागले. વાહनांची वाहतूक ठप्प झाल्याने परिसरात मोठी कोंडी निर्माण झाली.


Recent Comments