ऊसाला योग्य दर आणि साखर विक्रीतील नफ्यातील हिश्श्याच्या मागणीसाठी बेळगावात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची धग आता राज्यभर पोहोचवण्याचा इशारा ऊस उत्पादक शेतकरी नेते चुन्नाप्पा पुजारी यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य न केल्यास आगामी काळात संपूर्ण कर्नाटकात बंद पुकारण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी सरकारला दिला.
गेल्या महिनाभरापासून बेळगावात सुरू असलेले ऊस उत्पादकांचे आंदोलन पोलिसी बळाचा वापर करून दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप पुजारी यांनी केला. उसाच्या पहिल्या हप्त्यात प्रतिटन ३,६५० रुपये दर निश्चित करावा, तसेच साखर विक्रीतून मिळणाऱ्या नफ्याचे ७५:२५ या प्रमाणात वाटप करून त्यामध्ये शेतकऱ्यांना ७५ टक्के हिस्सा देण्याबाबत अधिकृत लेखी करार करावा, अशी त्यांची मागणी आहे. शेकडो शेतकरी आणि महिला आंदोलकांना पोलिसांनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन विविध गोदामे आणि दूरच्या पोलीस वसाहतींमध्ये ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला. मंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासह सरकारने यापूर्वी दिलेली आश्वासने पाळली नसल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांनी केवळ तोंडी शेतकरी हिताच्या गोष्टी न करता कृतीतून आपली भूमिका सिद्ध करावी, असे आव्हान त्यांनी दिले.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सिंगापूरमधील गुंतवणूक किंवा गुगलच्या डेटा सेंटरबाबत चर्चा करण्याऐवजी ऊस उत्पादकांच्या गंभीर प्रश्नांवर चर्चा करून योग्य तोडगा काढावा, अशी मागणी पुजारी यांनी केली. राज्यभरातील ऊसाला एकसमान दर निश्चित करण्याचा निर्णयही घ्यावा, असे त्यांनी सुचवले. हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाविरोधात नसून गरीब शेतकऱ्यांच्या जगण्याच्या हक्कासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उद्योगांसाठी रेड कार्पेट अंथरणाऱ्या सरकारने जळालेल्या उसासाठी एसडीआरएफ किंवा एनडीआरएफमधून भरपाई का दिली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
सरकारचे शेतकरीविरोधी धोरण आणि आश्वासनांची टाळाटाळ सुरूच राहिल्यास आंदोलन बेंगळुरूतील फ्रीडम पार्कपर्यंत नेण्यात येईल. त्यानंतर संपूर्ण राज्यात तीव्र स्वरूपाचे ‘कर्नाटक बंद’ आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा चुन्नाप्पा पुजारी यांनी दिला.


Recent Comments