ऊसदराच्या मागणीसाठी कागवाड तालुक्यात शेतकऱ्यांनी आक्रमक आंदोलन छेडले. कागवाड-जमखंडी, कागवाड-बेळगाव आणि कागवाड-विजापूर हे तीन राज्य महामार्ग रोखून वाहतूक बंद करण्यात आली.

कर्नाटक बंदच्या हाकेला प्रतिसाद देत कागवाड येथील राणी चन्नम्मा चौक आणि शेडबाळ रेल्वे स्थानकावरील पुलाजवळ रास्ता रोको करण्यात आला. शेडबाळ, उगार बुद्रुक, उगार खुर्द आणि ऐनापूर येथेही रस्ते अडवून वाहतूक रोखण्यात आली. हिरवी सेना संघटनेचे राज्याध्यक्ष चन्नाप्पा पुजारी आणि मानद अध्यक्ष शशिकांत गुरूजी यांनी मांडलेल्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला.


आमदार राजू कागे यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविताना ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात असल्याचे सांगितले. शेतीचा खर्च, मजुरी आणि मिळणारे उत्पन्न यांचा विचार करता ऊसशेती तोट्याची ठरत आहे. केंद्र सरकारने साखरेचे दर वाढविण्याकडे लक्ष द्यावे आणि राज्य सरकारनेही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली. पायाला दुखापत नसती तर आपण स्वतः आंदोलनाच्या अग्रभागी असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

माजी आमदार आणि ऊस आंदोलन समितीचे अध्यक्ष मोहनराव शहा यांनी सरकारने शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा न पाहता त्यांच्या न्याय्य मागण्या मान्य कराव्यात, असे आवाहन केले. शशिकांत गुरूजी आणि चन्नाप्पा पुजारी यांनी लाखो शेतकऱ्यांना एकत्र आणल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. शेतकरी नेते पद्मकुमार आळपनवर यांनीही मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी करत विलंब झाल्यास सरकारलाच त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला. या आंदोलनात उगार, शेडबाळ आणि कागवाड परिसरातील हजारो शेतकरी, युवक, लोकप्रतिनिधी आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.


Recent Comments