Belagavi

दिवाळीच्या खरेदीसाठी बेळगावच्या बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी!

Share

दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने बेळगावच्या बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने बाजारात दाखल होत आहेत.

बेळगावची प्रसिद्ध पांगुळ गल्ली, गणपत गल्ली आणि खडे बाजार या परिसरात खरेदीसाठी नागरिकांची विशेष गर्दी होत आहे. केवळ बेळगाव शहर आणि ग्रामीण भागातीलच नव्हे, तर कोकण आणि गोवा परिसरातूनही नागरिक मोठ्या संख्येने दिवाळीच्या खरेदीसाठी बेळगावमध्ये येत असतात. त्यामुळे बाजारपेठेत सध्या चांगलीच रेलचेल पाहायला मिळत आहे.

यंदा बाजारपेठेत दिवाळीच्या सजावटीसाठी विविध आकर्षक वस्तू दाखल झाल्या आहेत. वेगवेगळ्या आकारांचे आणि आकर्षक नमुन्यांचे आकाशकंदील, मातीचे दिवे, इलेक्ट्रिक दिवे, रंगीबेरंगी रांगोळ्या, लक्ष्मीपूजनाचे साहित्य, अगरबत्ती, कापूर, धूप, पाच फळे, फुलांचे हार तसेच विविध प्रकारच्या रंगीबेरंगी विद्युत रोषणाईच्या माळांनी दुकाने सजली आहेत.

याशिवाय लहान मुलांना आकर्षित करणारे छोटे-छोटे आकाशकंदील आणि विविध प्रकारच्या सजावटीच्या वस्तूंचे स्टॉलही बाजारपेठेत उभारण्यात आले आहेत. प्रत्येक दुकानात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू मांडण्यात आल्या आहेत.

दिवाळीच्या सणासाठी आवश्यक असणारे पूजेचे साहित्य आणि सजावटीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी महिला, पुरुष तसेच लहान मुलांची मोठी गर्दी होत आहे. बाजारपेठेतील दुकाने आणि स्टॉलवर ग्राहकांची वर्दळ वाढल्याने संपूर्ण बेळगाव बाजारपेठ दिवाळीच्या उत्साहात न्हाऊन निघाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

Tags: