देशातील वाढत्या महागाईला केंद्र सरकारची चुकीची धोरणे जबाबदार असल्याचा आरोप ज्येष्ठ आमदार लक्ष्मण सवदी यांनी केला आहे.
विरोधी भाजपकडून राज्य सरकारवर वास्तवाचा विचार न करता आरोप केले जात असल्याची टीकाही त्यांनी केली. उत्तर कन्नड जिल्ह्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना लक्ष्मण सवदी यांनी भाजप नेत्यांना महागाईची कारणे समजण्याइतकेही भान नसल्याचा टोला लगावला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरच्या तुलनेत रुपयाचे घसरते मूल्य आणि केंद्र सरकारकडून पेट्रोल-डिझेलच्या दरात होणारी वाढ यामुळे देशभरातील वाहतूक खर्च वाढला आहे. इंधनाचे दर वाढले नसते, तर वाहतूक खर्च आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही वाढल्या नसत्या, असे ते म्हणाले. भाजप नेत्यांनी आरोप करण्यापूर्वी बी. एस. येडियुरप्पा, जगदीश शेट्टर आणि डी. व्ही. सदानंद गौडा मुख्यमंत्री असतानाच्या निर्णयांचा इतिहास तपासावा. दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना चार बोटे स्वतःकडे असतात, हे त्यांनी विसरू नये, असा टोलाही सवदी यांनी लगावला.

विरोधी पक्षाचे काम केवळ प्रत्येक गोष्टीला विरोध करणे किंवा रस्त्यावर उतरून आंदोलन करणे नाही. सत्ताधारी पक्षाकडून चुका झाल्यास त्या निदर्शनास आणून देऊन रचनात्मक सूचना करणे ही विरोधी पक्षाची खरी जबाबदारी आहे, असे सवदी म्हणाले. काँग्रेस सरकार महिला सक्षमीकरणाला विशेष महत्त्व देत असून, विविध क्षेत्रांतील आणि प्रशासकीय स्तरांवरील महिला आरक्षणाची पदे भरण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.


Recent Comments