State

दिवाळीची भेट; एकाच दिवशी ७ हजार कोटी रुपयांचे वितरण

Share

गृहलक्ष्मी योजनेच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी महत्त्वपूर्ण संवाद साधला. योजनेला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दिवाळीची भेट म्हणून एकाच दिवशी ७ हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले असून, लाभार्थ्यांनी स्वतःचा मोबाईल क्रमांक आणि बँक खाते वापरावे, असा सल्ला त्यांनी दिला.

लाभार्थ्यांशी थेट संवाद साधल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी, लवकरच या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळालेल्या एकूण रकमेचा आकडा १ लाख रुपयांवर पोहोचणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. योजनेच्या पैशांचा गैरवापर होत असल्याच्या तसेच बँकांकडून जुन्या कर्जाच्या वसुलीसाठी ही रक्कम खात्यातून वळती केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची कठोर तपासणी करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी नागरिकांना सावकारांच्या मीटर व्याजाच्या आणि बेकायदा चिटफंडच्या जाळ्यात अडकू नये, असा इशाराही मुख्यमंत्री शिवकुमार यांनी दिला. अशा प्रकारे नागरिकांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्यांविरोधात सरकारकडून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर गृहलक्ष्मी योजनेची तीन वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याबद्दल ७ हजार कोटी रुपये वितरित करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, सायंकाळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या सरकारच्या पुढील कृती आराखड्याबाबतच्या महत्त्वपूर्ण बैठकीत सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Tags: