State

मेट्रो उद्घाटनाशी भाजपचा काय संबंध? मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचा सवाल

Share

मेट्रो उद्घाटनावरून भाजपला लक्ष्य करताना पंतप्रधानांना उद्घाटनासाठी निमंत्रण आपणच दिले असल्याचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ऊस उत्पादकांच्या आंदोलनात प्रतिष्ठेचा विषय न करता चर्चेतून तोडगा काढावा, असे आवाहनही त्यांनी केले.

कनकपुरा येथे शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवकुमार यांनी मेट्रो विकासासाठी जनतेचा पैसा आणि कर्जाचा वापर होत असल्याचे सांगितले. मेट्रोसंदर्भातील काही मुद्दे १३ नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांसमोर मांडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधानांना निमंत्रण आपण दिले असताना काहीजण त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

ऊस उत्पादकांनी आंदोलन मागे घेतल्याबाबत बोलताना, शेतकऱ्यांना आंदोलनात प्रतिष्ठेचा विषय न करण्याचे आवाहन केल्याचे त्यांनी सांगितले. साखर कारखानदार आणि मंत्र्यांनी यासंदर्भात चर्चा केली आहे. काही कारखानदारांनी ऊस गाळपाला परवानगी आणि संरक्षण मिळावे यासाठी न्यायालयात धाव घेतली असून, त्यासंदर्भात सरकारकडून प्रतिज्ञापत्र दाखल केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

साखरेचा दर केंद्र सरकारने निश्चित करावा, अशी मागणी पंतप्रधानांसमोर मांडण्यासाठी पत्रही पाठविण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितल्याचे शिवकुमार यांनी नमूद केले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघाला नाही तर बेळगावातील हिवाळी अधिवेशन होऊ देणार नाही, अशी धमकी देणे योग्य नाही. शेतकऱ्यांशी बोलताना सौजन्य राखले पाहिजे. त्यांना अरे-तुरे करून बोलणे हा त्यांचा अपमान असल्याचे सांगत शेतकऱ्यांना सन्मानाने वागविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्ली येथे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. ही बैठक सुमारे दीड तास चालणार असून, त्यात सहभागी होण्यासाठी दिल्लीला जात असल्याचे शिवकुमार यांनी सांगितले. दिवाळी सणामुळे दिल्लीत अन्य कोणाची भेट घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कनकपुरा येथे तीन-चार दिवसांनंतर परत येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags: