Belagavi

दिवाळीत किल्ले उभारण्याची लगबग; शिवरायांसह मावळ्यांच्या प्रतिकृतींना मोठी मागणी!

Share

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात पारंपरिक मातीचे किल्ले उभारण्याची लगबग सुरू झाली आहे. किल्ल्यांसाठी लागणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या प्रतिकृतींना बाजारपेठेत मोठी मागणी आहे.

दिवाळीनिमित्त बेळगावच्या पांगुळ गल्ली, गणपत गल्ली आणि खडेबाजार परिसरात किल्ले उभारणीसाठी लागणारे विविध साहित्य विक्रीसाठी दाखल झाले आहे. दिवाळीत घरासमोर आणि गल्लीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण करून देणारे ऐतिहासिक किल्ले उभारण्याची परंपरा बेळगावात आजही जपली जाते. त्यामुळे लहान मुलांमध्ये किल्ल्यांचे साहित्य खरेदी करण्याचा उत्साह दिसून येत आहे.

बाजारपेठेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकृती, मावळे, घोडेस्वार आणि तोफांच्या छोट्या प्रतिकृती लक्ष वेधून घेत आहेत. मुले आपल्या पालकांसोबत बाजारात येऊन आवडीच्या साहित्याची खरेदी करत आहेत. दिवाळीत किल्ले उभारण्याच्या या परंपरेतून नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्यशाली इतिहास आणि मराठा साम्राज्यातील गडकिल्ल्यांचे महत्त्व समजत आहे. त्यामुळे बेळगावच्या बाजारपेठेत ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडत आहे.

Tags: