Dharwad

स्टिंग प्रकरणाबाबत मी अनभिज्ञ: आमदार विनय कुलकर्णी

Share

स्टिंग प्रकरणाची मला कोणतीही माहिती नाही. मी टीव्ही पाहत नाही आणि मोबाईलचा वापरही करत नाही, केवळ दूरध्वनीवरून संवाद साधतो, असा खुलासा धारवाडचे आमदार विनय कुलकर्णी यांनी केला.

धारवाड येथे पत्रकारांशी बोलताना आमदार विनय कुलकर्णी यांनी स्टिंग ऑपरेशनवर भाष्य करण्याचे टाळले. या विषयाची आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या बैठकीबाबत बोलताना, शेतकरी हा देशाचा कणा आहे हे केवळ विधान करून चालणार नाही, असे ते म्हणाले. पदवीनंतर आपण स्वतः शेती क्षेत्रात कार्य केले आहे. सध्या डिझेलचे दर, खतांच्या किमती आणि मजुरी वाढल्याने शेतकर्‍यांना जीवनमान चालवणे कठीण झाले आहे. कित्तूर येथे हजारो शेतकर्‍यांची उपस्थिती असतानाही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी धैर्याने पुढे येत आश्वासन दिले, याबद्दल आपण त्यांचे अभिनंदन करतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.

शेतकर्‍यांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी २६ ऑक्टोबर रोजी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत शेतकरी व सरकार यांच्यात सकारात्मक चर्चा होऊन मार्ग निघणे आवश्यक आहे. शेतकर्‍यांसोबतच साखर कारखान्यांचे अस्तित्वही टिकले पाहिजे. एमएसपी वाढली नाही तर कारखाने चालवणे अशक्य होईल. केंद्र सरकारने सुरुवातीला इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन दिले. मात्र, सध्या प्रत्येक कारखान्यात सुमारे सात लाख लिटर इथेनॉल पडून असून साठवणुकीसाठी टँक उपलब्ध नाहीत. उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये १०० टक्के इथेनॉल खरेदी केले जाते, मग कर्नाटकाबाबत हा भेदभाव का, असा सवाल त्यांनी केला. देशात एकच कायदा व नियम असावा. एका राज्यासाठी वेगळा आणि दुसऱ्या राज्यासाठी वेगळा न्याय अयोग्य आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी कारखाना मालकांनाही बैठकीस पाचारण केले आहे.

केवळ शेतकर्‍यांची बाजू ऐकून चालणार नाही. साखर कारखाने बंद पडल्यास ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत येतील. त्यामुळे शेतकरी आणि कारखाने दोन्ही टिकणे गरजेचे असून, त्यासाठीच मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत, अशी प्रतिक्रिया आमदार विनय कुलकर्णी यांनी दिली.

Tags: