चालू वर्षातील रब्बीच्या हंगामात चांगला पाऊस पडणार असून पिके उत्तम येतील, अशी भविष्यवाणी कोडीमठाचे डॉ. शिवानंद शिवयोगी राजेंद्र स्वामीजी यांनी वर्तवली आहे.
धारवाड येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी, यापूर्वी मान्सूनबाबत वर्तवलेल्या अंदाजानुसार पाऊस कमी झाला, पाण्याची टंचाई निर्माण झाली आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागला असे सांगितले. मात्र, यंदा रब्बीचा पाऊस चांगला पडणार असून नागरिकांना समृद्धी आणि समाधान लाभेल, तसेच निसर्गाचे संतुलनही उत्तम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अखंड राज्याच्या एकतेसाठी साहित्यिक आणि सांस्कृतिक पाया, जनजीवन तसेच पाऊस आणि पिके उत्तम असणे गरजेचे आहे. या दृष्टीने धारवाडमधील जंबू सवारी हे राज्याच्या संस्कृतीचे प्रतीक आहे. म्हैसूर आणि उत्तर कर्नाटकातील जंबू सवारी एकतेचा संदेश देत असून, मानवी मूल्यांचे आणि पूर्वजांच्या आदर्शांचे जतन करणे हाच या उत्सवाचा मुख्य उद्देश आहे, असे स्वामीजींनी स्पष्ट केले.
राजकीय परिस्थितीबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना, राजकारणाविषयी तुमच्याकडेच अधिक माहिती आहे, सर्वांचे कल्याण होवो आणि सर्वांवर दैवी कृपा राहो, असे स्वामीजींनी म्हटले. चांगला पाऊस होऊन रोगराई दूर व्हावी आणि मानवी जीवनात शांतता व समाधान नांदावे हीच प्रार्थना असल्याचे डॉ. शिवानंद शिवयोगी राजेंद्र स्वामीजी यांनी सांगितले.


Recent Comments