ऊस पिकाला हमीभाव मिळण्यासह विविध मागण्यांसाठी बेळगाववरून हुबळीकडे निघालेली शेतकऱ्यांची पदयात्रा रविवारी धारवाडमध्ये दाखल झाल्यानंतर आज यरिकोप्प येथील धरणे आंदोलनस्थळी पोहोचली आहे.

केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी ही पदयात्रा येथेच स्थगित करण्याची शक्यता असून, पुढील रणनीती ठरवण्यासाठी यरिकोप्प येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

धारवाडच्या तेगूर येथून निघालेली पदयात्रा आता यरिकोप्प येथील आंदोलनस्थळी पोहोचली आहे. रविवारी उशिरा रात्री केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी नेते चुन्नप्पा पुजारी आणि शशिकांत गुरुजी यांच्यासह १० प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत केंद्रीय मंत्र्यांनी मागण्यांबाबत सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन देत पदयात्रा मागे घेण्याची विनंती केली होती.
केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनानंतर चुन्नप्पा पुजारी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने इतर शेतकरी नेत्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्याचे स्पष्ट केले होते. याच पार्श्वभूमीवर आज यरिकोप्प येथे शेतकरी नेत्यांची बैठक बोलावण्यात आली असून, बैठकीतील चर्चेनंतर पदयात्रा स्थगित करण्याबाबत आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे.


Recent Comments