ऊस पिकाला हमीभाव वाढवून देणे आणि राज्यातील इथेनॉल खरेदीसह विविध मागण्यांसाठी गेल्या पाच दिवसांपासून बेळगावच्या हत्तरगी येथून हुबळीतील केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासाकडे निघालेल्या पदयात्रेने धारवाडमध्ये प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी रविवारी उशिरा रात्री प्रमुख शेतकरी नेत्यांसोबत बैठक घेतली

रविवारी उशिरा रात्री हुबळीतील सर्किट हाऊस येथे पोलीस बंदोबस्तात शेतकरी नेते चुन्नप्पा पुजारी आणि शशिकांत गुरुजी यांच्यासह १० प्रमुख शेतकरी नेत्यांना धारवाडच्या तेगूर येथून आणण्यात आले. ही बैठक आधी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानी होणार होती, परंतु शेतकरी नेत्यांच्या आक्षेपानंतर ती सर्किट हाऊस येथे घेण्यात आली.
या बैठकीदरम्यान केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत केंद्र सरकारने आधीच तज्ज्ञ समिती स्थापन केली असून, बेळगावच्या सुवर्णसौध येथे लवकरच या समितीची बैठक घेतली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच हमीभाव वाढवण्यास सरकार कटिबद्ध असून तज्ज्ञ समितीच्या अहवालानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या बैठकीनंतर शेतकरी नेत्यांनी कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे आज तेगूर येथे होणाऱ्या बैठकीत शेतकरी नेते चुन्नप्पा पुजारी आणि शशिकांत गुरुजी आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करणार आहेत.


Recent Comments