Belagavi

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार सकारात्मक: प्रल्हाद जोशी

Share

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक पावले उचलत असून, केंद्र सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्पष्ट केले.

ऊस उत्पादकांच्या विविध मागण्यांसंदर्भात खासदार जगदीश शेट्टर आणि शेतकरी नेत्यांसोबत हुबळी येथील सर्किट हाऊसमध्ये आयोजित बैठकीत प्रल्हाद जोशी बोलत होते. शेतकरी प्रतिनिधी मंडळ, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत आधीच एक समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती लवकरच बैठक घेऊन प्रश्नांवर तोडगा काढणार आहे. ही प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी योग्य वातावरण निर्माण होणे गरजेचे असून, शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन जोशी यांनी केले.

या वेळी माजी मंत्री सी. सी. पाटील यांनी सांगितले की, ऊस उत्पादकांच्या मागण्यांबाबत शेतकरी नेत्यांशी सविस्तर चर्चा झाली आहे. स्थापन केलेली समिती लवकरच बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांवर योग्य निर्णय घेईल, असे सी. सी. पाटील यांनी सांगितले.

राज्य शेतकरी संघाचे अध्यक्ष चुन्नप्पा पुजारी म्हणाले की, मंत्री, खासदार आणि आमदारांनी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. या पार्श्वभूमीवर इतर शेतकरी नेत्यांशी चर्चा करून आंदोलन पुढे चालू ठेवायचे की तात्पुरते स्थगित करायचे यावर निर्णय घेतला जाईल, असे प्रतिक्रिया चुन्नप्पा पुजारी यांनी दिली.

या बैठकीला शेतकरी नेते चुन्नप्पा पुजारी, शशिकांत गुरुजी यांच्यासह शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, माजी मंत्री सी. सी. पाटील, आमदार महेश टेंगिणकाई, तसेच बेळगाव आणि धारवाड जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व पोलीस अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, हुबळीतील बैठकीत आंदोलनाबाबत अंतिम निर्णय न झाल्याने आज धारवाड जिल्ह्यातील तेगूर येथे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे.

Tags: