हुबळी-धारवाडचे पोलीस आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर भूषण बोरसे यांनी गुन्हेगारी नियंत्रण आणि कायदा-सुव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, या दोन्ही शहरांतील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे.


शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विशेष ‘अँटी-स्टॅबिंग स्क्वॉड’ (Anti-Stabbing Squad) स्थापन करण्यात आले असून, सार्वजनिक ठिकाणी चाकू किंवा घातक शस्त्रे बाळगून फिरणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे.


हुबळी बसस्थानक, रेल्वेस्थानकासह शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी या विशेष पथकाकडून कसून तपासणी केली जात आहे. कोणाकडेही चाकू किंवा इतर घातक शस्त्रे आढळल्यास त्यांच्याविरोधात आर्म्स ॲक्टनुसार तात्काळ गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

चाकू हल्ला आणि घातक शस्त्रांचा वापर करून घडणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत पोलिसांनी एकाच दिवसात तब्बल २१५ वाहनांची कसून तपासणी केली आहे.


Recent Comments