Belagavi

बेळगावमध्ये वाळलेली पिके हातात धरून शेतकऱ्यांचा राज्य सरकारविरोधात एल्गार

Share

पावसाची दडी आणि तीव्र वीज तुटवड्यामुळे पिके वाया गेल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी बेळगावच्या राणी चन्नम्मा चौकात वाळलेली पिके हातात घेऊन राज्य सरकारच्या धोरणांविरोधात निदर्शने केली.
राज्य शेतकरी संघटनेच्या वतीने बेळगाव येथील राणी चन्नम्मा चौकात हे आंदोलन करण्यात आले. पाऊस आणि विजेअभावी वाळलेली पिके हातात घेऊन रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांनी सरकारच्या भूमिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.

बेळगाव, विजापूर आणि बागलकोटसह राज्यातील सर्व ३१ जिल्हे त्वरित दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावेत, अशी मागणी शेतकरी नेते किशन नंदी यांनी केली. तसेच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना प्रति एकर किमान ५० हजार रुपयांची भरपाई देऊन केंद्र सरकारने संपूर्ण कर्जमाफी करावी, असे किशन नंदी यांनी म्हटले.

उसासह सर्व प्रमुख पिके जळून गेली असून पिण्याच्या पाण्याचीही भीषण टंचाई निर्माण झाली आहे. लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन मुख्यमंत्र्यांनी तातडीने शेतकऱ्यांच्या मदतीला धावून यावे, अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते चूनप्पा पुजारी यांनी दिली.

शेतीसाठी दररोज १२ तास अखंडित वीज द्यावी आणि भारनियमनाची समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. सरकारने तातडीने योग्य पावले उचलली नाहीत तर येत्या काळात राज्यभर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

या आंदोलनात जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: