M K HUBLI

तलवारीने वाढदिवसाचा केक कापला अन् तुरुंगाची हवा खाल्ली

Share

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी कायदा हातात घेऊन तलवारीने केक कापणाऱ्या तरुणांना बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर पोलिसांनी अटक केली आहे.

एम.के. हुबळी परिसरात वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी नियमांचे उल्लंघन करून रील बनवणे या तरुणांना महागात पडले आहे. एम.के. हुबळी शहराजवळील एनएच-४८ रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाजवळ झैद नूरअहमद सनदी या तरुणाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी झैदने दुचाकीवर ५ केक ठेवून सार्वजनिक ठिकाणी तलवारीने ते कापले, तर रेहान नावाच्या तरुणाने याचे चित्रीकरण करून व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला. या प्रकाराची गंभीर दखल घेत कित्तूर पोलिसांनी इन्स्टा व्हिडिओच्या आधारे झैद आणि रेहान या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींवर भारतीय शस्त्रास्त्र कायदा १९५९ अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी कायदा हातात घेतल्यास तुरुंगवास निश्चित आहे, तसेच पालकांनी आपल्या मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, असा कडक इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिला आहे.

Tags: