Vijayapura

बेंगळुरू-विजापूर रेल्वे प्रवासाचा कालावधी ५ तासांनी घटणार

Share

ऐतिहासिक विजापूर आणि राजधानी बेंगळुरूदरम्यान हुबळी व गदग बायपास मार्गाने रेल्वे सेवा पुरवण्यासाठी रेल्वे मंडळाने नवीन रेल्वेगाड्यांना मंजुरी देणे आवश्यक आहे. यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि व्ही. सोमण्णा यांना पत्र लिहिणार असल्याची माहिती पायाभूत सुविधा विकास मंत्री एम.बी. पाटील यांनी दिली.

बुधवारी विविध खर्च वाटपाच्या रेल्वे योजनांसंदर्भात नैर्ऋत्य रेल्वेच्या उच्चाधिकाऱ्यांसोबत झालेल्या प्रगती आढावा बैठकीनंतर एम.बी. पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. सध्या बेंगळुरू आणि विजापूर दरम्यान रेल्वे प्रवासाला सुमारे १५ तास लागतात. हा कालावधी १० तासांपर्यंत खाली आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून, हुबळी आणि गदग बायपास मार्गावरून रेल्वे सेवा पुरवण्यास रेल्वे अधिकाऱ्यांनी कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट केले आहे. बेंगळुरूहून हुबळीपर्यंत नियमित थांबे देऊन, तिथून विजापूरपर्यंत स्थानिक लोकांना सोयीचे होईल अशा प्रकारे रेल्वे सेवा सुरू केल्यास ती अधिक प्रभावी ठरेल, असेही अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.

सध्या बेंगळुरू – विजापूर रेल्वेला हुबळी आणि गदग रेल्वे स्थानकांवर इंजिन बदलावे लागते. यामुळे प्रवासाचा कालावधी वाढत आहे. त्यामुळे, या दोन्ही बायपास मार्गांवरून रेल्वे धावल्यास प्रवासाचा वेळ कमी होईल, असे त्यांनी नमूद केले. विजापूर जिल्ह्यातील वंदाल आणि आलमट्टीदरम्यान दुहेरीकरण मार्गाचे काम बाकी असून, ते फेब्रुवारी २०२६ पर्यंत पूर्ण होईल. या भागात कृष्णा नदीवर अर्धा किलोमीटर लांबीच्या भव्य पोलादी पुलाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. तसेच, मार्चपर्यंत विद्युतीकरणासह दुहेरी मार्गाच्या बांधकामाला पूर्णत्व येईल. त्यानंतर सध्या धावत असलेल्या रेल्वेगाड्यांचा वेग वाढेल. यासोबतच, नवीन रेल्वेगाड्यांची मागणीही करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना विनंती करणार असल्याचे एम.बी. पाटील यांनी सांगितले.

Tags: