पाण्याखाली गेलेला पूल बाईकवरून पार करण्याचा प्रयत्न करताना वाहून गेलेल्या दोन तरुणांपैकी अद्याप एका तरुणाचा शोध लागला नसून शोधकार्य योग्य पद्धतीने होत नसल्याबद्दल कुटुंबीयांनी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कार्यशैलीवर संताप व्यक्त केला आहे.

विजापूर जिल्ह्याच्या तालिकोटी शहराबाहेर डोणी नदीवरील पाण्याखाली गेलेल्या पुलावरून २४ सप्टेंबर रोजी घडलेल्या या दुर्घटनेत ताळिकोटे तालुक्यातील वडवडगी गावाचे महांतेश आणि संतोष हे दोघे वाहून गेले होते. पाण्याखाली गेलेला पूल बाईकवरून पार करण्याचा प्रयत्न करताना ही दुर्घटना घडली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक लोकांनी महांतेशला वाचवले होते. संतोषचा शोध घेण्यात आला, परंतु दुर्घटनेला तीन दिवस उलटूनही संतोष हडपद याचा अद्याप पत्ता लागलेला नाही. कुशल जलतरणपटू, बोटी आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून शोधकार्य अजूनही सुरू आहे.
नदीच्या काठी तळ ठोकून असलेल्या कुटुंबीयांनी, अजूनही शोध घेतला नाही, असे म्हणत आपला तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांसोबत त्यांचे वादविवादही झाले. तेव्हा अधिकाऱ्यांनी, संतोषचा शोध घेण्याचे काम थांबवलेले नाही, सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगून कुटुंबीयांचे समाधान केले. आज चौथ्या दिवशीही शोधकार्य सुरू आहे.


Recent Comments