Vijayapura

जातीनिहाय जनगणना सोनिया गांधींच्या सांगण्यावरून: आमदार यत्नाळ

Share

जातीनिहाय जनगणना सोनिया गांधींच्या सूचनेनुसार केली जात असल्याचा आरोप विजापूर शहराचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केला आहे.

विजापूर शहरात माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “या जनगणनेत ख्रिश्‍चन कुरुब, ख्रिश्‍चन लिंगायत आणि ख्रिश्‍चन वोक्कलिगा अशी नवीन नावे दिली जात आहेत. ही सर्व सोनिया गांधींनी दिलेली नवी नावे आहेत.”

पुढे बोलताना यत्नाळ म्हणाले, “काही लोकांना देशाला ख्रिश्‍चन राष्ट्र बनवायचे आहे, तर काहींना मुस्लिम राष्ट्र बनवायचे आहे, म्हणून हे जातींचे वर्गीकरण केले जात आहे. अशा जाती आपल्या देशात आणि जगात कुठेही नाहीत. सोनिया गांधींच्या निर्देशानुसार मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ही खालच्या पातळीची व्यवस्था केली आहे. त्यांच्याच मंत्रिमंडळात यावरून गोंधळ सुरू आहे. सिद्धरामय्या यांनी हे थांबवावे.”

“जातीनिहाय जनगणना करण्याचा अधिकार राज्याला नाही, तो केंद्राला आहे. ही जनगणना म्हणजे लिंगायत आणि वोक्कलिगांची संख्या कमी दाखवून मुस्लिमांची संख्या जास्त असल्याचे सिद्ध करण्याचा नाटक आहे,” असेही ते म्हणाले.

बुकर पारितोषिक विजेत्या बानू मुश्ताक यांच्या दसरा उद्घाटनाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत ते म्हणाले की, “हा धार्मिक भावनांशी संबंधित विषय आहे. त्यामुळे न्यायालयात जाणे चुकीचे होते, कोर्टात याला आव्हान द्यायला नको होते.”

भाजपचे माजी मुख्यमंत्री आणि मंत्री मुस्लिमांच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्याच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “धार्मिक कार्यक्रम वेगळे असतात आणि इतर ठिकाणी होणारे कार्यक्रम वेगळे असतात. मंदिर किंवा मशिदीतील कार्यक्रमांना जाणे योग्य नाही. ते जात नाहीत आणि आपणही जायला नको. यासाठी काहीतरी कारण शोधले जात आहे.”

दसरा उद्घाटनासाठी दलितांना संधी देऊ नये, या विधानाबाबत स्पष्टीकरण देताना यत्नाल म्हणाले, “काही संपादक आहेत, ज्यांनी प्रियांक खर्गे आणि विजयेंद्र यांच्यासोबत मिळून हे संपादन केले आहे.” यत्नाळांश विरोधकांकडून सुरु असलेल्या अशा आरोपांमुळे राज्यातील राजकारण तापले असून, जातीय जनगणनेवरून सुरू झालेला वाद आगामी काळात अधिक वाढण्याची शक्यता आहे.

Tags: