Hukkeri

हुक्केरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा : आमदार निखिल कत्ती

Share

हुक्केरी तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावा, अशी जोरदार मागणी स्थानिक आमदार निखिल कत्ती यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

राज्य सरकारने बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्याला दुष्काळग्रस्त भागांच्या यादीतून वगळल्याच्या निषेधार्थ आमदार निखिल कत्ती यांच्या नेतृत्वाखाली पक्षीय भेद विसरून भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला.

शहरातील पी कार्ड बँक आवारात एकत्र आलेल्या शेतकऱ्यांनी रॅली काढून कोर्ट सर्कल येथे रस्ता रोको आंदोलन केले व राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

एप्रिलच्या अखेरीस चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, मात्र ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, असे कत्ती यांनी स्पष्ट केले.

त्यामुळे हुक्केरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना पीक भरपाई देणे, कर्जाची माफी करणे आणि तलावांमध्ये पाणी सोडण्यासाठी योग्य वीजपुरवठा करण्याची मागणी त्यांनी केली. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

Tags: