Hukkeri

तंत्रज्ञानाच्या प्रगतीमध्ये अभियंत्यांचे योगदान मोलाचे: श्रीधर कोरी

Share

जगात तंत्रज्ञानाच्या झालेल्या प्रगतीमध्ये अभियंत्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन कर्नाटक विद्युत महामंडळाच्या काळी प्रकल्पाचे मुख्य अभियंता श्रीधर कोरी यांनी केले.

हुक्केरी तालुक्यातील हिडकल जलाशयातील घटप्रभा वीज निर्मिती केंद्रात भारत रत्न सर एम. विश्वेश्वरय्या यांची १६५ वी जयंती आणि ५९ वा अभियंता दिन साजरा करण्यात आला. स्थानिक अभियंता बसवराज डी. यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन काळी प्रकल्पाच्या बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता शिल्पा डी. राज यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.

यावेळी बोलताना श्रीधर कोरी म्हणाले की, जग पुढे जाण्यामागे तंत्रज्ञान कारणीभूत असून त्यात अभियांत्रिकी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. या कार्यक्रमाला सुपा धरणाचे अधीक्षक अभियंता अशोक कुमार एच. एस., प्रवीणकुमार अरळिकट्टी, नरसय्या देवय्या, आर. व्ही. मापारी, दांडेलप्पा पी. एम. आणि सुषमा सी. पी. उपस्थित होते. घटप्रभा वीज निर्मिती केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी सर्व मान्यवरांचा सत्कार केला.

तत्पूर्वी, मुख्य कार्यालयाच्या आवारात असलेल्या सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या पुतळ्यास अधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. माध्यमांशी बोलताना मुख्य अभियंता शिल्पा डी. राज यांनी सर एम. विश्वेश्वरय्या हे सर्व अभियंत्यांचे आदर्श असून त्यांच्या स्वप्नांचा आणि विचारांचा वारसा सर्वांनी पुढे चालवला पाहिजे, असे सांगितले.

यानंतर उपस्थितांना शपथ देण्यात आली, तसेच प्रश्नमंजुषा आणि संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यकारी अभियंता बसवराज डी. यांनी प्रास्ताविक करताना, कर्नाटक विद्युत महामंडळाच्या दोन्ही मुख्य अभियंत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडल्याबद्दल आनंद व्यक्त करत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. या प्रसंगी घटप्रभा वीज निर्मिती केंद्राचे कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

राजू बागलकोटी
इन न्यूज
हुक्केरी

Tags: