Khanapur

खानापूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी

Share

खानापूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी आणि त्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात, या मागणीसाठी अखिल कर्नाटक किसान संघातर्फे बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. संघटनेचे राज्य उपाध्यक्ष किशोर मिठारी यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी शिष्टमंडळाने हे निवेदन सादर केले.

खानापूर तालुक्यापासून अवघ्या काही अंतरावर असलेले अळनावर आणि कितूर तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत. मात्र खानापूर तालुक्याला यातून वगळून सरकार भेदभाव करत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.

खानापूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून प्रति एकर २५ हजार रुपये भरपाई द्यावी, उसाला प्रतिटन ६ हजार रुपये दर निश्चित करावा आणि शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच मलमप्रभा नदीवर धरण बांधून सिंचन व पिण्याच्या पाण्याची सोय करावी, असेही निवेदनात नमूद आहे.

याशिवाय विजेचे खाजगीकरण थांबवून शेतकऱ्यांना दररोज सात तास थ्री-फेज वीजपुरवठा करावा आणि खानापूर तालुक्यातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी मांडण्यात आली.

येत्या आठ दिवसांत खानापूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित न केल्यास ८ ऑक्टोबर रोजी लिंगनमठ क्रॉस येथे राज्य महामार्गावर रात्रंदिवस धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा किशोर मिठारी यांनी दिला आहे. हे निवेदन कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे पाठवण्यात आले आहे.

या प्रसंगी माजी ग्रामपंचायत सदस्य अशपाक अहमद पटेल, दयानंद गुपित, गोपाळ वीरापूर, लक्ष्मण चन्नापूर, कुतुबुद्दीन शेख, बिष्टप्पा सुंबळी, सेबॅस्टिन सोझ, गोपाळ अगसीमणी, अंतोन सोझ, पॉल फर्नांडिस यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Tags: