ऊस पिकाचा उत्पादन खर्च वाढत असल्याने कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी तुळशीची शेती हा शेतकऱ्यांसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो, असे कृषी तज्ज्ञ व युवा शेतकरी राहुल शिरगुप्पे यांनी सांगितले.

कागवाड तालुक्यातील शिरगुप्पी गावात राहुल शिरगुप्पे यांनी आपले मित्र तीर्थंकर चौगुले यांच्यासह तुळशीची प्रयोगात्मक शेती सुरू केली आहे. सध्या शेती क्षेत्रात हवामान बदल, रोगांचा प्रादुर्भाव, मजुरांची टंचाई आणि बाजारातील दरातील चढ-उतार यामुळे शेतकरी संकटात आहेत. उसाचा उत्पादन खर्च वाढला असून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत येत आहेत.

तुळशीची लागवड करताना शेणखत घालून जमीन तयार केली जाते आणि ५ फुटांच्या अंतरावर रोपांची लागवड केली जाते. ठिबक सिंचनाद्वारे अत्यंत कमी पाण्यात हे पीक घेता येते. किडींचा प्रादुर्भाव नगण्य असल्याने कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळते. लागवडीनंतर दोन महिन्यांनी यंत्राद्वारे कापणी करता येते.
एका एकरात एका कापणीत सुमारे ४०० किलो सुकी तुळस मिळते. तमिळनाडूतील सेलम येथे औषध निर्मितीसाठी ही तुळस ७० रुपये प्रति किलो दराने खरेदी केली जाते. एका कापणीतून ३० ते ३५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. एका एकरात योग्य नियोजन केल्यास वर्षाला सुमारे ४ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते, अशी माहिती त्यांनी दिली. अधिक माहितीसाठी ९०७१५५७००८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सुकुमार बन्नुरे
इन न्यूज कागवाड


Recent Comments