Kagawad

ऐनापूर येथे कागवाड तालुकास्तरीय शिक्षक दिन सोहळा उत्साहात

Share

कागवाड तालुक्यातील ऐनापूर येथील सिद्धेश्वर सभागृहात तालुकास्तरीय शिक्षक दिन सोहळा अत्यंत उत्साहात व दणक्यात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे दिव्य सानिध्य लाभलेले चामराजनगर येथील बिळगिरीरंगन टेकडीचे शांतमल्लिकार्जुन स्वामीजी यांनी उपस्थितांना आशीर्वाद दिले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी घालून दिलेला मार्ग आणि सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणासाठी दिलेली प्रेरणा हीच आजच्या शिक्षण व्यवस्थेची खरी दिशा आहे, असे प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणात केले.

या सोहळ्यात गेल्या वर्षी सेवांनिवृत्त झालेल्या २४ शिक्षकांचा, १० वी (SSLC) परीक्षेत उत्तम निकाल देणाऱ्या २५ माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांचा तसेच जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त इस्माईल बेग, एस. बी. तिप्पिमणी आणि बी. टी. करियन्नवर यांचा विशेष सन्मान व सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी वीरण्णा वाली, तहसीलदार रवींद्र हादिमनी, गटशिक्षण अधिकारी (BEO) चेन्निगरामय्या, नगर पंचायत अध्यक्षा लक्ष्मी सुरेश अडिशीरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आणि शेकडो शिक्षक उपस्थित होते. भरत बिलवडे व एस. जे. चौगुला यांनी सूत्रसंचालन केले, तर श्रीशैल माळी यांनी आभार मानले.

Tags: