Vijayapura

मी काँग्रेसमध्येच राहणार, आता मंत्रिपदाची कोणतीही अपेक्षा नाही: आमदार यशवंतरायगौडा पाटील

Share

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने आमदारकीचा राजीनामा दिलेले विजापूर जिल्ह्यातील इंडी मतदारसंघाचे आमदार यशवंतरायगौडा पाटील यांनी आपला राजीनामा अधिकृतपणे मागे घेतला आहे.

विजापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा होती. मात्र ऐनवेळी संधी हुकल्याने दुःखी होऊन राजीनामा दिला होता. राजीनाम्यानंतर काँग्रेस नेते रणदीपसिंग सुरजेवाला, अनेक आमदार, मठाधीश व ज्येष्ठ नेत्यांनी राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. तसेच मतदारसंघातील जनतेच्या भावनांचा आदर करत आमदारकीचा राजीनामा मागे घेतला आहे.

मुख्यमंत्र्यांनी आपल्याशी चर्चा करून शांत राहण्याचा सल्ला दिल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे कोणत्याही पदासाठी कोणाच्याही दारात जाणार नाही, आत्मसन्मानच माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेस पक्षातच राहणार असून आता मंत्रिपदाची कोणतीही अपेक्षा ठेवणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

आमदार बसणगौडा पाटील यत्नाळ यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना, यत्नाळ यांच्याकडून शिकण्याची गरज नसून त्यांना त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांबद्दल आदर नाही, असा टोला त्यांनी लगावला. याशिवाय, इंडी तालुक्याला नवीन जिल्हा म्हणून घोषित करण्याच्या विषयाला प्राधान्य देण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.

Tags: