विजापूर जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा त्रास पुन्हा एकदा समोर आला आहे. इंडी शहरात दोन बालकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला असून, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही केवळ इंडी शहरापुरती मर्यादित समस्या नसून संपूर्ण विजापूर जिल्ह्यात कुत्रे चावण्याच्या घटना चिंताजनक रीतीने वाढल्या आहेत.

विजापूर जिल्ह्यातील इंडी येथील रेवत मड्डी परिसरातील गुत्तेदार लेआउटमध्ये घरासमोर खेळणाऱ्या ९ वर्षांच्या प्रेरणा गवळी या मुलीवर भटक्या कुत्र्याने हल्ला केला. या हल्ल्यात मुलीच्या चेहऱ्यावर आणि डोळ्याखाली दुखापत झाली असून तिच्यावर इंडी तालुका रुग्णालयात उपचार करण्यात आले. तसेच करीम नगर येथे दुकानात जाणाऱ्या ५ वर्षांच्या तैमूर मकानदार या बालकावरही कुत्र्याने हल्ला करून त्याला जखमी केले. या दोन्ही घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

आरोग्य विभागाच्या आयडीएसपी माहितीनुसार, १ जानेवारी ते २३ फेब्रुवारी या ५४ दिवसांच्या कालावधीत विजापूर जिल्ह्यात ४,५५२ कुत्रे चावण्याच्या घटनांची नोंद झाली होती. विजापूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे केवळ उपचारांपुरते मर्यादित न राहता नसबंदी आणि रेबीज लसीकरण यांसारख्या वैज्ञानिक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
स्थानिक प्रशासनाने भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक झाले आहे. नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन संबंधित विभाग यावर काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विजयकुमार सारवाड
इन न्यूज
विजापूर


Recent Comments