मंत्रिमंडळ विस्ताराला होत असलेल्या विलंबावरून विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी सरकारवर टीका केली आहे. सर्व खाती स्वतःकडे ठेवण्यासाठी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार कारणे सांगत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

विजापूर येथील कर्नाटक राज्य अक्कमहादेवी महिला विद्यापीठात बोलताना यत्नाळ यांनी मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर टाकण्यावर प्रश्न उपस्थित केले. राहुल गांधी, प्रियंका गांधी व्यस्त असल्याचे तसेच सोनिया गांधी यांच्या प्रकृतीचे कारण सांगून विस्तार पुढे ढकलला जात असल्याचा दावा त्यांनी केला. मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब होत असल्याने सर्व खाती मुख्यमंत्र्यांकडेच राहत असून, त्यामुळे निर्णय प्रक्रिया केंद्रीत होत असल्याचा आरोप यत्नाळ यांनी केला. मंत्र्यांअभावी अनेक विभागांच्या फाईली प्रलंबित असून अधिकारीही कामे न होण्याची कारणे देत असल्याचे त्यांनी सांगितले.

कोणत्याही सरकारमध्ये मुख्यमंत्री शपथ घेतानाच पूर्ण मंत्रिमंडळाची नियुक्ती झाली पाहिजे. अन्यथा मंत्रिपदासाठीच्या मागण्या आणि राजकीय घडामोडींमध्येच वेळ जातो, असे यत्नाळ यांनी म्हटले. राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरही त्यांनी चिंता व्यक्त केली. राज्यात दुष्काळ असताना कृषिमंत्री नसल्याची टीका करत, केवळ मुख्यमंत्र्यांनी शेतात जाऊन फोटो काढल्याने शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही. केंद्राच्या पथकाने येऊन परिस्थितीचा आढावा घ्यायला हवा होता. सध्या प्रशासन म्हणजे केवळ डी. के. शिवकुमार असेच झाले आहे, अशी टीका बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केली.


Recent Comments