Bellary

बळ्ळारी जिल्ह्यात दुष्काळाचे सावट; कामाच्या शोधात ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर

Share

पावसाच्या अभावामुळे बळ्ळारी जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून रोजगारासाठी नागरिकांना गाव सोडावे लागत आहे. जिल्ह्यातील बेळगल तांड्यातील ३०० हून अधिक कुटुंबे घरे बंद करून परराज्यात तसेच लगतच्या जिल्ह्यांमध्ये स्थलांतरित झाली आहेत.

बळ्ळारी जिल्ह्यात पाऊस नसल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. काम धंदा नसल्याने आणि घेतलेले कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत बेळगल तांड्यातील शेकडो कुटुंबे बेंगळुरू, मांड्या, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राच्या दिशेने रोजगारासाठी जात आहेत.

स्थानिक कारखान्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध नसून, ग्रामीण भागातील रोजगार हमी योजनेचे कामही वेळेवर मिळत नसल्याचे चित्र आहे. तसेच शासकीय योजनांची मदत वेळेवर पोहोचत नसल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे.

सुमारे ३०० हून अधिक घरांना कुलूप लागले असून, सरकारने स्थानिक पातळीवर तातडीने रोजगाराची पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी बाधित ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Tags: