विजापूर जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस न पडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून संपूर्ण जिल्ह्यातील कृषी कामे ठप्प झाली आहेत.

दरवर्षी या काळात सुमारे ७.५ लाख हेक्टर क्षेत्रात पेरण्या पूर्ण होत असत. मात्र, यंदा पावसाअभावी कोरडवाहू भागातील केवळ १८ ते २० टक्के जमिनीवरच पेरणी झाली असून लाखो एकर शेतजमीन पडीक राहिली आहे. बँका आणि सावकारांकडून कर्ज काढून शेतकऱ्यांनी जमिनीची मशागत केली होती, मात्र पाऊस गायब झाल्यामुळे शेतकरी आता आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. सरकारने किमान कर्जाचे व्याज तरी माफ करावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

पाऊस वेळेवर झाला असता तर तूर, मूग, सूर्यफूल, उडीद यांसारखी मुख्य पिके आतापर्यंत जोमाने आली असती. जलाशयाच्या पाण्यावर अवलंबून पेरणी करू नका, असा सल्ला सरकारने दिला आहे. मात्र, कर्ज काढून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. चारा नसल्यामुळे जनावरे विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
मुसळधार पाऊस पूर्णपणे हुलकावणी देऊन गेल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. सरकारने विजापूर जिल्हा तातडीने दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावा आणि संकटग्रस्त बळीराजाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
विजयकुमार सारवाड,
इन न्यूज,
विजापूर.


Recent Comments