चालू वर्षातील मान्सून लांबल्यामुळे कोरडी पडलेल्या कृष्णा नदीत अखेर पाण्याचे आगमन झाले आहे. गुरुवारी सकाळी उगारनजीक नदीपात्रात पाण्याचा पहिला प्रवाह दाखल झाल्याने स्थानिक शेतकरी, मच्छीमार आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

गुरुवारी सकाळी कृष्णा नदीत पाण्याचा प्रवाह सुरू झाल्याचे पाहताच परिसरातील शेतकऱ्यांनी नदीकाठावर जलपूजन केले. यंदा जून महिन्यात पावसाने प्रदीर्घ ओढ दिल्यामुळे खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या असून पिके आणि ऊस शेती पाण्यासाठी करपू लागली होती. पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये म्हणून प्रशासनाने पंधरा दिवसांपूर्वी नदीकाठच्या पंपसेटचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने शेती वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू होती. या संकटसमयी नदीला पाणी आल्याने पिकांना जीवदान मिळाल्याची भावना उगार पालिकेचे सदस्य आणि शेतकरी नेते वीरभद्र कटगेरी यांनी व्यक्त केली.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली पाण्याची प्रतीक्षा संपल्याचे उगार साखर कारखान्याचे ज्येष्ठ कामगार सुभाष मुचंडी म्हणाले.
नदी कोरडी पडल्याने महिनाभरापासून ठप्प झालेली मासेमारी आता पुन्हा सुरू होणार असल्याची अपेक्षा स्थानिक मच्छीमारांनी व्यक्त केली. पाण्याचा हा प्रवाह नदीकाठच्या गावांसाठी वरदान ठरणार आहे.


Recent Comments